लंडन : भारताच्या मद्य निर्यातीला चालना देण्यासाठी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणने (अपेडा) लंडनमधील मद्य मेळाव्यात दहा निर्यातदारांना सहभागी केले होते.
7-9 जून दरम्यान लंडन इथे मद्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा जगातील सर्वात महत्त्वाच्या मद्य व्यापार कार्यक्रमांपैकी एक मानला जातो.
लंडन इथे मद्य मेळाव्यात सहभागी झालेल्या भारतीय निर्यातदारांमध्ये रेझवेरा वाईन, सुला वाईनयार्ड्स, गुड ड्रॉप वाईन सेलर्स, हिल झिल वाईन्स, केएलसी वाईन्स, सोमा वाईन व्हिलेज, ग्रोव्हर झाम्पा वाईनयार्ड, प्लॅटॉक्स विंटनर्स, ASAV वाईनयार्ड्स आणि फ्रॅटेली वाईनयार्ड्स यांचा समावेश आहे.
भारत ही अल्कोहोलिक पेयांसाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ असून , धान्य-आधारित अल्कोहोलिक पेये बनवण्यासाठी वार्षिक 33,919 किलो-लिटर परवानाधारक क्षमता असलेल्या 12 संयुक्त उपक्रम कंपन्या आहेत. भारत सरकारच्या परवान्याअंतर्गत सुमारे 56 कंपन्या बिअरचे उत्पादन घेत आहेत.
भारताने 2020-21 मध्ये 322.12 दशलक्ष डॉलर्स किमतीची 2.47 लाख मेट्रिक टन अल्कोहोलिक उत्पादने जगभरात निर्यात केली आहेत. 2020-21 मध्ये भारतीय अल्कोहोलिक उत्पादने संयुक्त अरब अमिराती, घाना, सिंगापूर, काँगो आणि कॅमेरून आदी देशांना निर्यात करण्यात आली.
महाराष्ट्रात 35 हून अधिक वाईनरीज असल्यामुळे महाराष्ट्र हे मद्य उत्पादनासाठी महत्त्वाचे राज्य बनले आहे. महाराष्ट्रात मद्य निर्मितीसाठी सुमारे 1,500 एकर क्षेत्र द्राक्ष लागवडीसाठी वापरले जाते. मद्य निर्मितीला चालना देण्यासाठी, राज्य सरकारने मद्य निर्मिती व्यवसायाला लघु उद्योग म्हणून घोषित केले आहे आणि अबकारी दरात सवलत देखील दिली आहे.
माल्टपासून बनवलेली बिअर, वाईन, व्हाईट वाईन, ब्रँडी, व्हिस्की, रम, जिन सारख्या भारतातील अल्कोहोलिक पेयांची मागणी जागतिक बाजारपेठेत अनेक पटींनी वाढली आहे.
अपेडाने भारतीय मद्याच्या क्षमतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यांमध्ये अनेक कार्यशाळा आणि वाइन टेस्टिंग कार्यक्रम आयोजित केले आहेत.
भारतीय मद्य निर्मिती उद्योगाची 2010 ते 2017 या कालावधीत 14 टक्क्यांच्या चक्रवाढ वार्षिक वृद्धी दराने वाढ झाली असून हा देशातील अल्कोहोलिक पेये अंतर्गत सर्वात वेगाने वाढणारा उद्योग बनला आहे.