नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयातील नोक-यांच्या 10% जागा आवश्यक पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. हे 10% आरक्षण भारतीय तटरक्षक दल, नागरी संरक्षण दलातील पदे आणि सार्वजनिक क्षेत्रातील सर्व 16 संरक्षण उपक्रमांमध्ये लागू केले जाईल – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल), भारत डायनॅमिक्स लिमिटेड. (BDL), गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) लिमिटेड, गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL), हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL), माझगाव डॉक शिपबिल्डर्स (MDL), मिश्र धातू निगम (Midhani) लिमिटेड, आर्मर्ड व्हेईकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (AVNL) , अॅडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंटस लिमिटेड (AW&EIL), म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), यंत्र इंडिया लिमिटेड (YIL), ग्लायडर्स इंडिया लिमिटेड (GIL), इंडिया ऑप्टेल लिमिटेड (IOL) आणि ट्रूप कम्फर्टस् लिमिटेड (TCL). हे आरक्षण माजी सैनिकांसाठी असलेल्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असेल.

या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित भरती नियमांमध्ये आवश्यक सुधारणा केल्या जातील. सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उपक्रमांना त्यांच्या संबंधित भरती नियमांमध्ये तशाच प्रकारच्या सुधारणा करण्याचा सल्ला दिला जाईल. वरील पदांवर अग्निवीरांची भर्ती करणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक वयोमर्यादेतील शिथिलता तरतूददेखील केली जाईल.
..
सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्येही आरक्षण
अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षे पूर्ण करणा-या अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारत सरकारने, तरुणांना सैन्यदलांमध्ये चार वर्षे कामाची आणि देशसेवेची संधी देणारी अग्निपथ योजना नुकतीच घोषित केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या ट्विटर संदेशांनुसार- “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भारत सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत चार वर्षे पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे.”
“सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये भरती करण्याबाबत अग्निवीरांसाठी वरची वयोमर्यादा 3 वर्षांनी वाढविण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. त्याखेरीज, अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी पूर्वनिर्णित वयोमर्यादेपलीकडे 5 वर्षांपर्यंत मुभा असेल.” असेही त्या ट्विटर संदेशांमध्ये म्हटले आहे.







