नवी दिल्ली : ओल्या रस्त्यांवरून जाताना गाड्या स्लीप होणे आता टळू शकते. त्यासाठी वाहनांच्या टायरचे डिझाइन अधिक चांगले करण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. त्यामुळे इंधनही वाचणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 28 जून 2022 रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम क्रमांक 95 मध्ये सुधारणा करण्याबाबतची अधिसूचना जारी केली. या नव्या सुधारणेनुसार, वाहनांमधील सी 1 (प्रवासी कार), सी2 (हलक्या वजनाचे ट्रक) आणि सी3(ट्रक आणि बस) या श्रेणीतील टायरचा रोलिंग रेझिस्टन्स, वेट ग्रिप आणि रोलिंग साऊंड एमिशन्स यांचा दर्जा ऑटोमोटिव्ह उद्योग मानके 142:2019 मध्ये निश्चित केल्यानुसार असणे अनिवार्य करण्यात आले आहे. उपरोल्लेखित टायर्सनी वेट ग्रिप बाबतच्या अटी आणि रोलिंग रेझिस्टन्स तसेच रोलिंग साऊंड एमिशन्स यांच्या बाबतीत टप्पा – 2 ची मर्यादा पाळणे आवश्यक करण्यात आले आहे. या नव्या नियमामुळे, भारतातील संदर्भित नियम संयुक्त राष्ट्रांच्या युरोपसाठीच्या आर्थिक आयोगाच्या नियमांना अनुरूप होतील.
वाहनाच्या टायरचा रोलिंग रेझिस्टन्स हा इंधनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतो; वेट ग्रिपची कामगिरी वाहन ओल्या रस्त्यांवर प्रवास करताना त्या वाहनाच्या ब्रेकच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पाडते आणि वाहनांची सुरक्षितता वाढविते. रोलिंग साउंड एमिशन्स म्हणजे वाहन रस्त्यावरून जात असताना त्याचे टायर आणि रस्त्याचा पृष्ठभाग यांच्यातील संपर्कामुळे होणा-या आवाजाचे उत्सर्जन होय.