ढाका : भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे तीन दिवसांच्या बांगला देश दौ-यावर आले आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील उत्कृष्ट द्विपक्षीय संरक्षण संबंध वृद्धींगत करण्यासाठी जनरल मनोज पांडे, 18 ते 20 जुलै 2022 या कालावधीसाठी या बांगलादेशमध्ये असतील. लष्करप्रमुख म्हणून जनरल मनोज पांडे यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.
18 जुलै 2022 रोजी शिखा अनिर्बन येथे पुष्पहार अर्पण करून 1971 च्या मुक्तिसंग्रामात सर्वोच्च बलिदान देणा-या शूरवीरांना आदरांजली वाहून लष्करप्रमुखांनी आपल्या दौ-याची सुरुवात केली. लष्करप्रमुख सुरक्षा आस्थापनांच्या वरिष्ठ अधिका-यासोबत बैठका आणि संरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर विचारांचे आदान-प्रदान करतील. बांगलादेशचे राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान स्मारक संग्रहालयाला भेट देऊन ते श्रद्धांजली अर्पण करतील.
आपल्या दौ-याच्या दुस-या दिवशी लष्करप्रमुख मीरपूरच्या डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना संबोधित करतील. त्यानंतर ते बांगलादेशातील एक प्रमुख संस्था जी संयुक्त राष्ट्रांच्या विविध शांतता मोहिमांमध्ये रोजगारासाठी शांती सैनिकांना प्रशिक्षण देते अशा “बांग्लादेश इन्स्टिट्यूट ऑफ पीस सपोर्ट अँड ऑपरेशन ट्रेनिंग (BIPSOT)” या संस्थेला भेट देऊन या सदस्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ते मीरपूर येथील बंगबंधू लष्करी संग्रहालयाला भेट देतील.
लष्कर प्रमुखांच्या भेटीमुळे दोन्ही देशांच्या सैन्यांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील. दोन्ही देशांमधल्या सामायिक मुद्द्यांवर समन्वय आणि सहकार्य निर्मितीसाठी ही भेट महत्त्वाची ठरेल.