मुंबई – जागतिक पोस्टकार्ड दिनानिमित्त भारतीय टपाल विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चेंबूरसह विविध परिसरात राहणा-या सेलिब्रिटींना पोस्टमन, पोस्टवुमननी पोस्टकार्डे देऊन टपाल विभाग आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची गाथा सांगितली.
संबंधित अभिनेते, सामाजिक कार्यकर्त्यांनीही टपाल विभागाच्या कर्मचा-यांचे कौतुक केले. उन्हापावसाची तमा न बाळगता कर्मचारी करीत असलेल्या लोकसेवेचा सर्वांनी गौरव केला.
महाराष्ट्राचे लोकप्रिय भाऊजी अर्थात आदेश बांदेकर यांनाही पोस्टकार्ड देण्यात आले. त्यांनी करोनाकाळातही टपाल कर्मचारी करीत असलेल्या कार्याचा विशेष गौरव केला. पत्र हा जिवाभावाचा सखा असून संवादाचे जुने आणि हवेहवेसे माध्यम असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पूर्वी लिफ्ट नव्हत्या तरीही पोस्टमन इतके जिने चढून संबंधितांची पत्रे त्यांच्या हातात देत असत, अशी आठवण सांगत, बांदेकर यांनी टपाल खात्यातील सर्व कर्मचारी व अधिकारी अभिनंदनास पात्र असल्याचे सांगितले.
देशात टपाल विभागाचे जाळे मोठे आहे. एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयांमार्फत हा कारभार चालतो. जगातील अशा स्वरूपाचे हे सर्वात मोठे जाळे आहे. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत आणि इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात. नुकत्याच झालेल्या जागतिक पोस्टकार्डाप्रमाणेच, दरवर्षी ९ ऑक्टोबर रोजी जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. या कालावधीत देशभर विविध उपक्रम साजरे केले जातात.
सध्याच्या टपाल व्यवस्था, सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये १६८८मध्ये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉरन हेस्टिंग्ज हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना त्याच्याकडे मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या देखरेखीचे अधिकार होते. त्या काळात १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली. पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४चा टपाल कायदा अस्तित्वात आला व, त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार टपाल खात्याला देण्यात आला. मात्र, आजही सर्वांत स्वस्त आणि सुलभ म्हणून पोस्टकार्ड लोकप्रिय आहे.







