नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गासाठी पाच हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून आगामी दोन वर्षांत हा प्रवास दोन तासांत होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे व्यक्त केला.
गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी येथे १,६७८ कोटी रुपये खर्चाच्या २०६ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या १२ प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन झाले. या प्रकल्पांमध्ये १,६७८ कोटी रुपये खर्चाच्या २०६ किलोमीटरच्या १२ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा समावेश आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आलेली आहेत. नव्या महामार्गांच्या प्रकल्पामुळे नाशिकची कनेक्टिव्हिटी संपूर्ण देशात वाढणार आहे. सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर ते चेन्नईपर्यंतच्या ग्रीनफील्ड एक्स्प्रेस-वे प्रकल्पाला भारतमाला परियोजना फेज-एक अंतर्गत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच नाशिक ते मुंबई महामार्गाच्या दुरुस्तीसह त्याच्या नूतनीकरणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या मंजुरीसह पिंपरीसदो ते गोंदे या २०0 किमी मार्गाचे सहा पदरीकरण व नाशिकरोड ते द्वारका ईलिव्हेटेड कॉरिडॉर करणार असल्याची घोषणाही गडकरी यांनी या वेळी केली.
हॉर्न नव्हे भारतीय वाद्ये
कर्कश हॉर्नमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणाचा विचार करता येत्या काळात सगळ्या गाड्यांचे हॉर्न भारतीय वाद्यातच वाजले पाहिजेत यासंदर्भात नियम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात रस्ते अपघातामुळे होणा-या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. नाशिकमध्येही लॉजिस्टिक पार्क बांधायला आपण तयार असून महापालिकेने याकामी पुढाकार घ्यावा असे त्यांनी नमूद केले.
विकासाचा चौफेर दृष्टीकोन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कर्तृत्वातून उभा देश पाहतोय, अनुभवतोय असे प्रतिपादन यावेळी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारामुळे आज आदिवासी दुर्गम भागातील वाहतूक अत्यंत सुलभ झाली असून त्यामुळे वाडे-पाडे शहराशी जोडले गेले असून कोरोनाकाळात केवळ वेळच नाहीतर कितीतरी जीव या राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीमुळे वाचले असल्याची भवना यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादाजी भुसे, नाशिकचे पालकमंत्री छगन चंद्रकांत भुजबळ, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.







