वर्धानगरीत जमला साहित्यिकांचा मेळा
वर्धा : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगणात साहित्य नगरी सजली आहे.
चरखा देऊन स्वागत
वर्ध्यातील गोपुरी येथील ग्रामोद्योग भांडारात तयार करण्यात आलेले चरखे देऊनपाहुण्यांचे स्वागत केले जाणार आहेत. हा चरखा केवळ प्रतिकात्मक राहू नये त्यामुळे प्रत्यक्ष सूत कताई करणारा पेटी चरखा देण्यात येणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर आहेत. उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रमाला येणार्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा चरखा देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
हा साहित्यिकांचा सोहळा : मुख्यमंत्री
हा साहित्यिकांचा सोहळा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी स्पष्ट केले. ते म्हणाले की, मराठी साहित्याशी कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत, मराठी साहित्यामुळे नायकाची भूमिका मिळते अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
उदघाटन सोहळ्याला राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्याक्ष ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे यांच्यासह ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास आदींची उपस्थिती होती.
दिवसभर या परिसरात भरगच्च कार्यक्रम होणार असून यात संमेलनाध्यक्षांचे भाषण, विविध विषयांवरचे परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, विविध कट्टयांचे उद्घाटन असे कार्यक्रम राहणार आहे. विविध ठिकाणाहून साहित्यिक, साहित्य रसिक वर्धेत दाखल झाले आहेत. पुढचे तीन दिवस साहित्य नगरीत साहित्याचा जागर होणार आहे. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष व संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदिप दाते याच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या यशस्वितेसाठी विविध समित्यां कार्यरत आहेत. वर्धेकराचा संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
साहित्य संमेलनात…
• सकाळी 8 वाजता – ग्रंथदिंडी
• आचार्य विनोबा भावे सभामंडप
• सकाळी 10.30 वाजता – संमेलनाचे उद्घाटन
• दुपारी 2.00 वाजता – ‘कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद
• दुपारी 4.30 वाजता – संमेलनाध्यक्षांचे भाषण
• सायं. 5.30 वाजता – ‘आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे’ वर परिसंवाद
• सायं. 7.00 वाजता – ‘ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रिय’वर परिसंवाद
• रात्री 8.30 वाजता – निमंत्रितांचे कविसंमेलन
मनोहर म्हैसाळकर सभामंडप
• दुपारी 2.00 वाजता – कथाकथन
• सायं. 6.30 वाजता – ‘विदर्भातील बोलीभाषा’ वर परिसंवाद
• सायं. 8.00 वाजता – ‘मृदगंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा’ विशेष कार्यक्रम
इतर कार्यक्रम
• दुपारी 2.00 वाजता – प्रा. देविदास सोटे कविकट्ट्याचे उद्घाटन
• दुपारी 2.00 वाजता – कविवर्य सुरेश भट गझल कट्टयाचे उद्घाटन
• दुपारी 4.00 वाजता – ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचचे उद्घाटन
ग्रंथप्रदर्शन आकर्षणाचे केंद्र : सासणे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीत आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथप्रदर्शनीचे आणि ग. त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचाचे साहित्य संमेलनाचे मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या उद्घाटन पार पडले.
यावेळी आयोजन समितीचे सल्लागार गिरीश गांधी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, डॉ. रविंद्र शोभणे, विलास मानेकर, विसा संघाचे वर्धा शाखाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, प्रा.राजेंद्र मुंढे यांच्यासह माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॅा.सुरज मडावी, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॅा.गजानन कोटेवार, साहित्यिक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.