बिननौर – उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील कोषागारानं अर्थात ट्रेझरी ऑफिसनं गेल्या ५० वर्षांपासून ७३ किलो चांदीच्या वस्तू, दागिने जपून ठेवलेत. इंदिरा गांधींच्या नावानं ही मौल्यवान भेट तिजोरीत सांभाळून ठेवलीय. कशासाठी तर, गांधी घराण्यातलं कुणीतरी येईल आणि ते घेऊन जाईल म्हणून. मंडळींनो या अद्भुत घटनेमागची कथा जशी अद्भूत आहे तशीच ती भारतीय राजकारणाचा वेगळा पैलू दाखविणारी आहे. गांधी घराण्यातील कुणी येईल आणि ही चांदीची मौल्यवान भेट घेऊन जाईल, याची प्रतीक्षा आहे.
गोष्ट आहे. १९७२मधली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी उत्तर प्रदेश उत्तराखंड सीमेवर असलेल्या कालागड धरणाला भेट दिली होती. त्यावेळी तिथल्या स्थानिकांनी त्यांची चांदीने तुला केली. मौल्यवान धातूच्या वस्तू त्यांना सादर केल्या होत्या. या दागिन्यांत चांदीच्या विटा अन् अन्य दागिने आहेत. इंदिरा गांधींनी त्या वस्तू घेण्यास नकार दिला. त्यांनी तिथनं निघताना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रेमाच्या भेटीची काळजी घेण्यास सांगितलं.
गेल्या ५० वर्षांपास्नं पडून असलेल्या या चांदीच्या वस्तूंवर कुणीही दावा केलेला नाही. गांधी घराण्यातलं कुणीही तिथं गेलं नाही. स्थानिक प्रशासनानं २००२मध्ये भारतीय रिजर्व्ह बँकेला इंदिरा गांधींच्या या भेटीचा ताबा घेण्याबाबतचं पत्र लिहिलं होतं. मात्र, बँकेनं त्यास नकार दिला. ती खाजगी मालमत्ता असल्याचं कारण तेव्हा बॅँकेनं दिलं होतं. याच कारणानं इंदिरा गांधी संग्रहालयानंही या वस्तू घेण्यास नकार दिलाय.
त्यामुळं ५० वर्षांपेक्षा अधिक काळापासून इंदिरा गांधी यांना दिलेल्या या चांदीचं काय करायचं हा प्रश्न प्रलंबित आहे. सुमारे ५१ लाख रुपये किमतीच्या ७३ किलो चांदीची ही भेट यूपीतल्या बिजनौरच्या तिजोरीत पडून आहे. वार्षिक तपासणीवेळी तिजोरीत ठेवलेली जड पेटी नियमित तपासली जाते. ती सीलबंद असल्यानं कधीही उघडली नाही.
या संपत्तीवर गांधी कुटुंबानं दावा केला तरच सर्व आवश्यक प्रक्रिया पार पाडून मौल्यवान वस्तू त्यांच्या ताब्यात दिल्या जाऊ शकतात असा एक पर्याय आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी या चांदीवर दावा करणार का, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतोय.