अभय सुपेकर

आपणां सर्वांना नूतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
गुढी पाडव्याचा सण, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. आंग्ल कॅलेंडरशी पूर्णपणे एकरूप झाल्यानं आपल्याला आपल्या कॅलेंडरचा म्हणजेच पंचांगाचा विसर पडला आहे. त्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदा, शालीवाहन शके… म्हणजेच वर्षाचा पहिला दिवस हे लगेच लक्षात येत नाही. हा दिवस म्हणजेच गुढी पाडवा. रामायण आणि महाभारतामधील अनेक घटनांचा आणि पाडव्याचा संबंध आहे. खंडप्राय देशात पंचांग आणि शक, कालगणना पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा समान धागा म्हणजे, ते सर्व इथल्या मातीशी, निसर्गाशी एकरूप झालेलं आहे. तादात्म्य पावलेलं आहे. जी संस्कृती माती, निसर्गाशी एकतान होते ती विकसीत होऊन माणसाचं जगणं अधिक उन्नत आणि समृद्ध करते. गुढी पाडव्याचा तर उल्लेख आपल्या संत साहित्यात, लोकगीतात, पुराणात अशा सगळीकडे आढळतो. एका स्त्रीगीतात म्हटले आहे –
गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी
कुळाची किर्ती जावी दाही दिशा॥
माणसाच्या कर्तृत्वाचे, शौर्याचे प्रतिक म्हणून गुढीकडे पाहिले गेले आहे. संत एकनाथ तर म्हणतात,
हर्षाची उभवी गुडी, आनंदाला आपल्या जीवनातील स्थान ते अधोरेखित करतात. संत एकनाथांच्या अनेक रचनात गुढीचा उल्लेख येतो. ते ज्ञातेपणाची, भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, निजर्माची, सायुज्याची अशा कितीतरी प्रकारांनी गुढीचं रुपक वापरतात. गुढी पाडव्याचा आणि आपल्या जीवनव्यवहाराचा संबंध ते जोडतात.
आपली संस्कृती निसर्गाशी नातं सांगते. निसर्गातील स्थित्यंतराचे पडसाद आपल्या जगण्यावर उमटतात, आपण त्यानुसार जीवनचक्र निश्चित केले आहे. स्त्रीगीतात उल्लेख आहे –
गुढी पाडव्याला कडुलिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती अमृताची॥
जगण्यातील वास्तव निसर्गाशी नातं जोडत इथं व्यक्त केलं आहे. कस लागल्याशिवाय देवपण येत नाही. कडूपणातून आरोग्य संवर्धनही साधलं जातं, असं हे जगणं आहे.
सोळाव्या शतकातील विष्णूदास आपल्या ओव्यातून सांगतात –
आनंदु वो माये नगरी उत्सवो। आजि येईल रामरावो॥
किंवा
अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन। धन्य आजि दिन सोनियाचा॥
श्रीरामांनी रावणावर म्हणजे समाजातील कुप्रवृतीवर मिळवलेल्या विजयाचे साजरेपण ते व्यक्त करतात. समाजातील वैगुण्यावर मात करून पुढे जाण्याचा सल्ला देतात. तर संत चोखोबा म्हणतात –
टाळी वाजवावी गुढी उभारवी। वाट हे चालावी पंढरीची॥
संत साहित्यात जागोजागी गुढीच्या प्रतिकाचा वापर करून जगण्यातील उदात्तपणा अधोरेखित केला आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात –
अधर्माचि अवधी तोडीं। दोषांचीं लिहिलीं फाडीं। सज्जनांकरवी गुढी। सुखाची उभवीं॥

अधर्माला म्हणजे कुप्रवृत्तीला, कुविचाराला, विध्वंसक वृत्ती, आचाराला, कृतीला टाळून द्या. दोषांना मूठमाती द्या. सज्जनपणा अंगीकारा, सद्गुणांना अंगी बाणा. जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे सुख, समाधान, शांतता मिळवा. माऊलींचा हा संदेश आपण जीवनात प्रत्यक्षात उतरवला तर त्याचे सार्थक निश्चित होईल.








