“देवाची झोपमोड होतेय, काढा ते मशीन”
जगन्नाथ मंदिर प्रशासनानं काढायला लावलं उंदीर पळवणारं यंत्र
उंदीर पळवण्यासाठी ‘अर्थ इनोव्हेशन’ हे मशीन जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात
…
लाखो भाविकांच्या उपस्थितीचे विक्रम करणारी जगन्नाथाची यात्रा ज्या मंदिरापास्नं निघते. ते मंदिर म्हणजे पुरीतलं भगवान जगन्नाथाचं मंदिर. जगभरातल्या लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे. ते सध्या एका गमतीशीर कारणानं चर्चेत आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती या भव्य मंदिराच्या गाभाऱ्यात आहेत. त्यांची रात्री झोपमोड होत असल्याची तक्रार पुजाऱ्यांनी केली आहे. त्याला कारण मंदिर आणि परिसरातली उंदरांची वाढती संख्या हे आहे.
कोरोनानंतर मंदिराच्या प्रशासनाला उंदरांच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. मंदिराचं भव्य आवार, परिसर, त्याचप्रमाणं मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याबाबत मंदिर व्यवस्थापन, कर्मचारी व मंदिरातल्या पुजाऱ्यांनी तक्रार केली होती. झालं या तक्रारीनंतर सूत्रं हलली. जगन्नाथाचे भाविकही मोठे तत्पर. एका भाविकानं उंदीर पळवण्याचं यंत्र मंदिराला देणगी म्हणून दिलं.
‘अर्थ इनोवेशन’ असं या यंत्राचं नाव आहे. या यंत्रातनं विशिष्ट प्रकारचा आवाज होतो. त्याची उंदरांना भीती वाटते आणि त्यामुळं उंदरं हे यंत्र असलेल्या परिसराकडं फिरकत नाहीत. ,मात्र, यंत्राचा आवाजच देवांना त्रास देत असल्याची तक्रार आता करण्यात आली आहे. या आवाजामुळे देवांची झोप मोडत असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला आहे. त्यांच्या विरोधामुळे अखेर मंदिर प्रशासनाने हे यंत्र काढून टाकलंय.
पुरीतलं हे भव्य दिव्य मंदिर अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. तिथल्या मूर्ती, रथयात्रा, पूजाविधी या साऱ्यांना परंपरांचा मोठा इतिहास आहे. कित्येक वर्षांपासून भगवान जगन्नाथ रात्री झोपतात असं मानलं जातं. त्यामुळं रात्री विजयद्वार अर्थात मुख्य दरवाजापासून गाभाऱ्यापर्यंत निरव शांतता पाळली जाते. पूर्ण अंधार केला जातो. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांना शांतपणे झोप लागावी याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यामुळंच परंपरा, श्रद्धा आदी कारणांनी उंदरांना दूर पळविणारं यंत्र मात्र वादात सापडलंय.
आता यंत्राला विरोध होऊ लागल्यानं जुन्या पद्धतीनुसार लाकडी पिंजऱ्यांचा वापर केला जाणार आहे. पुन्हा एक अडचण म्हणजे मंदिर परिसरातली उंदरं मारली जात नाहीत. त्यामुळं त्यांना पिंजऱ्यात पकडून दूर सोडून द्यावं लागतं.
देवांना घातलेले उंची कपडे आणि फुलांच्या माळाही उंदीर कुरतडत आहेत. उंदरांमुळे परिसर आणि गाभाऱ्यातही दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळं उंदरांचा हा सुळसुळाट थांबवायचा कसा या विचारानं मंदिर प्रशासनाचीच झोप उडाली आहे.
पुरीतलं हे भगवान जगन्नाथांचं मंदिर जागतिक वारसा यादीतही आहे. त्याची स्थापत्यशैली अत्यंत मनमोहक व बुद्धीला कोडे पाडणारी आहे. या संपूर्ण स्थापत्याला उंदरांचा धोका आहे. मंदिराची मूळ रचना हे उंदीर आतून पोकळ करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंदिराची फरशी अनेक ठिकाणी अशाच प्रकारे पोकळ होत आहे. हे उंदरं पळवण्यासाठी आता भगवान जगन्नाथालाच साकडं घालण्याची वेळ प्रशासनापुढं आलीये हे मात्र नक्की.