अभय सुपेकर
ग्यानबा तुकाराम, रामकृष्ण हरी…, विठ्ठल विठ्ठल… च्या गजरात आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली, संत तुकोबा यांच्या पालख्या पंढरपूरच्या मार्गावर आहेत. संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, श्री गजानन महाराज यांच्या पालख्यांनी आधीच प्रस्थान केले आहे. अवघा महाराष्ट्र हरीनामाच्या गजरात आणि पंढरीत जाऊन विठूमाउलीच्या दर्शनाची आस घेवून दिंड्या-पताका घेवून, टाळ-मृदंगाच्या गजरात मार्गस्थ झाला आहे. सगळ्यांना ओढ आहे ती विठूमाउलीचं साजरं सुंदर रुप डोळाभार पाहून ते मनाच्या कुडीत जपून ठेवण्याची…
वारीच्या या सोहळ्याला गर्दीसाठी ना कोणाला निमंत्रण द्यावं लागतं, ना सांगावा… त्यासाठी असते ती उत्सफूर्तता… गेली आठ-दहा शतकांहून अधिक काळ अव्याहत सुरू असलेल्या या सोहळ्यामागे आहे ती सिद्धांतावरची श्रद्धा. कोणी भक्तीमार्गाने, नामस्मरणाने विठूमाउलीपर्यंत जावू पाहात असतो. त्या वाटेवर तो इतका तल्लीन, भावविभोर होतो की, माउलीच्या दर्शनाने तो न्हाऊन निघतो. कर्म सिद्धांतावर अढळ श्रद्धा असलेला शेतीवाडी, कुटुंबकबिल्याचं सगळं काही निस्तनी लावून ऊन-वारा, पावसाची तमा न बाळगता वाट तुडवत पंढरीत पोहोचतो, माऊलीचं दर्शन झालं न झालं तरी कळसाच्या दर्शनानं तृप्त होवून पुन्हा संसाराला जुंपण्यासाठी माघारी परततो. ज्याला त्यामागील ओढ, भावनिक, मानसिक अवस्था, त्यामागील कार्यकारण भाव पाहायचा, समजून घ्यायचा असतो, तो काहीसा डोळसपणे वारीबरोबर मार्गक्रमण करतो. काहीशा तटस्थतेने, काहीसे अंतर ठेवून चालत असतो. जेव्हा तो पंढरीत पोहोचतो, वेगवेगळी रिंगणं, वारकऱ्याचं जगणं पाहून अनुभवाच्या शिदोरीनं समृद्ध झाल्यानं ती तटस्थता, ते दुरावलेपण गळून पडते. तो वारी, वारकरी यांच्याशी एकरूप होवून पांडुरंग चरणी लिन होतो. वारीशी तादात्म्य पावतो.
खरंतर आध्यात्म्य हे ज्यानं-त्यानं आपल्या बौद्धिक कुवत, क्षमता, आकलन, अनुभव याच्यानुसार जाणावं इतकं सोपं त्याचं स्वरूप आहे. आध्यात्म जाणण्याचं व्यापक रुप आणि त्याची प्रयोगशाळा म्हणजे वारी होय. वारीमध्ये सर्व प्रकारच्या सिद्धांतांचा आविष्कार जो तो अनुभवत असतो. आपल्या नजरेतून आकळू पाहात असतो. या सगळ्याचं अंतिमतः साध्य असतं स्वाभाविकपणे ते त्या विटेवरील पांडुरंगाला समजून घेणे. नेटका संसार करत असताना अनुभवाला येणारा चढउतार, ऊन-पावसाचे क्षण, आशा-निराशेचे हिंदोळे आणि हेलकावे, अहम् पणा, मी पणा आणि अहंकाराला मूठमाती देणारे, माणसाच्या अंतःकरणात समर्पणाचा भाव, दुसऱ्याविषयीचा आदरभाव, त्याच्या मताला, विचाराला समजून घेत, भले नाही पटले तरी मैत्र जोडणारी वृत्ती अशा कितीतरी बाबींची शिकवण ही वारीमध्ये आपसूक मिळत असते. जगण्याच्या विविध सिद्धांतांना घासून-पुसून लख्ख करणारी, जगण्याची नवी दृष्टी, उमेद देणारी वारी… अशी कितीतरी रुपं आणि रंग घेवून अवतरत असतो. चला, आपण यावेळच्या वारीच्या अनुभवसागरात न्हाऊन घेवूया… विठ्ठल, विठ्ठल… रामकृष्ण हरी…
वारीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.