कोल्हापूरच्या देवीची मूर्ती विलोभनीय असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे. दर शुक्रवारी आणि अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष तसेच माघ या चारही पौर्णिमेस तसेच चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीप्रदक्षिणा काढली जाते. पालखीबरोबर देवीचे भालदार-चोपदार आणि भोई असतात. नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहनपूजा बांधतात. नवसाप्रित्यर्थ मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे.
चैत्र पौर्णिमेच्या वेळी एका मागे एक अशा चढत जाणार्या व दीपांनी पाजळेल्या तीन शिखरांचा देखावा अवर्णनीय दिसतो. देवळाच्या भिंतीवर नर्तकी, वाद्ये वाजविणार्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी, वीणावादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे आणि किन्नर कोरलेले आहेत.
कोल्हापूरची देवी म्हटलं की किरणोत्सव आठवतो. माघ महिन्यात होतो. मावळत्या दिनकराची सोनेरी किरणं हळूहळू अंबाबाईची प्रकाशानं पूजा बांधतात तेव्हा उपस्थित हजारो भाविक देवीपुढे नतमस्तक होतात.
कोल्हापूरच्या मंदिराचे संदर्भ मार्कडेय पुराण, पद्मपुराणात आढळतात हे मंदिर राष्ट्रकूट काळातील किंवा शिलाहारांच्या सुरुवातीच्या कालखंडातील आहे. त्यामुळे त्याची स्थापत्यशैली अठव्या शतकातील असल्याचं सांगितलं जातं. आताचं मंदिर संभाजी महाराजांनी बांधलेलं आहे. कोल्हापूरचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे बंदिस्त मंदिर समूहाच्या पश्चिमेला मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याला महाद्वार म्हणतात. मराठा काळातील नक्षीदार लाकडीछत आणि अन्य बांधकामशैली आपल्याला स्पष्ट दिसते. गर्भमंडप अशी अन्य स्थापत्यरचना वैशिट्यपूर्ण आहे.







