मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यात माहूर हे तीर्थक्षेत्र आहे. रेणुका मातेचा निवास असल्याने पूर्वी मातापूर असेही या क्षेत्राचे नाव होते. गडावर रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर यादवराजा देवगिरी यांनी सुमारे ८०० ते ९०० वर्षापूर्वी बांधले. मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुनर्बांधणी १५४६मध्ये झाली. मंदिराचा विस्तार तीनशे नव्वद वर्षांपूर्वी शालिवाहन राजाने १६२४मध्ये केला.
माहूर गडावरी, गडावरी गं तुझा वास
भक्त येतील दर्शनास
तुला बसायला गं बसायला
चंदनाचा पाट, जेवायला चांदीचे ताट
पुरणपोळीन गं पोळीनं भोजनाला
मुखी तांबूल देतो तुला
अशी प्रसिद्ध आरती, रेणुकेचे भक्त नवरात्रात हमखास म्हणतात. त्यात देवीची स्तुती आहे.
रेणुकेचे हे मंदिर वास्तुशास्त्रानुसार उभारण्यात आले आहे. गाभारा आणि सभामंडप असे त्याचे दोन भाग आहेत. गाभा-याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. देवीचा मुखवटा पाच फुट उंच आणि चार फूट रुंद आहे. दक्षिणाभिमुख चांदीने मढविलेल्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला जातो. तेव्हा रेणुकेच्या तांदळास्वरुप मुखकमलाचे दर्शन होते. तमाम भक्तांवर कृपादृष्टी ठेवणारी, रक्तवर्ण सिंदुरचर्चित हे रूप अवर्णनीय आहे. देवीने डोक्यावर चांदीचा टोप परिधान केला आहे. पितांबरामुळे ती अधिक विलोभनीय दिसते. विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत. भाळी मळवट भरलेला असुन, मुखामध्ये तांबूल आहे. त्याचाच प्रसाद भक्तांना दिला जातो.
सभामंडप परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मूर्ती आहेत. त्याचप्रमाणे परशुराम मंदिर, दत्त क्षेत्र, गणपती मंदिर, विष्णूकवी मठ, पांडवतीर्थ, औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ आदी स्थळे आहेत.
नवरात्रात विधीवत पूजा करुन दगडाच्या कुंडामध्ये मातृका भरुन त्यावर विविध पाच प्रकारचे धान्य टाकले जाते. त्या कुंडावर मातीचा कलश ठेऊन विडयाची पाने व श्रीफळ आणि कुंडाच्या बाजूला पाच ऊस उभारुन हार अर्पण केला जातो. नवरात्रात भाविकांची गर्दी असते. ललितापंचमीस देवीचे स्वरूप अधिकच तेजोमय होते. या दिवशी अलंकार पूजा केली जाते. महापूजा व महाआरती होते. अष्टमीस पहाटे विधीवत पूजा होते. नवमीस दिवसभर अष्टमीप्रमाणेच पूजा होते. नवमीचा यज्ञ होऊन पूर्णाहूती होते. विजयादशमीस देवीचे मुख्य ध्वज उतरवून ध्वजपताक्यास नवे वस्त्र चढविले जाते.
https://youtu.be/Z2ZuzcQnmgQ







