नाशिक जिल्ह्यातल्या कळवण-दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर वणी गावाजवळील पर्वतावर सप्तशृंगी देवीचं स्थान आहे. अठरा भुजा असलेल्या देवीचं भव्य रूप येथे भक्तांना दिसते. गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. तिन्ही दरवाजांतून देवीचे दर्शन होते. देवीची मूर्ती आठ फुटांची आहे. ती शेंदूरचर्चित आहे. प्रत्येक हातांत शस्त्रे आहेत. ब्रम्हा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली शस्त्रे तिला दैत्याशी लढण्यास दिल्याची श्रद्धा आहे. देवीला अकरा वार महावस्त्र लागते. मूर्तीच्या डोक्यावर सोन्याचा मुकूट, कर्णफुले, नथ आहे. गळ्यात पुतळ्यांचे गंठण आहे. कंबरपट्टा, पायांत तोडे अशा अलंकाराने देवीचे रूप अधिक खुलून दिसते.
देवीचे स्थान सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम डोंगररांगेत येते. सह्याद्रीच्या पठारावरील हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ४,५६९ फुटावर आहे. देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते. हा मार्ग खडतर असला तरी खान्देश आणि कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थात ‘कसमादे’ पट्ट्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाविक दरवर्षी अनवाणी ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. खान्देशातील अनेक कुटुंबांची ही कुलदेवता आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७२ पायऱ्या आहेत. मार्ग चढणीचा असून परतीचा मार्गही वेगळा आहे. त्याशिवाय अलीकडच्या काळात फनिक्युलर या तंत्राने पर्वतावर जाता येते.
या परिसरात सात शिखरे असल्याने त्याचे नाव सप्तशृंग असे आहे. देवीच्या मुख्य स्थानाबरोबरच गड परिसरात सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ आदी श्रद्धास्थळे आहेत.
जय सप्तशृंगवासिनी
माऊली आमुची
तूं कुलस्वामिनी
प्रबल नाथपंथाची
असा उल्लेख सप्तशृंगी देवीच्या आरतीत आहे. ‘शाबरी विद्ये’ची खरी सुरुवात सप्तश्रृंगी गडावरून झाल्याचे सांगितले जाते. ‘नवनाथ भक्तीसार’ या पोथीत या बाबतचे उल्लेख आहेत. निवृत्तिनाथांनी समाधी घेण्यापूर्वी काही दिवस देवीची उपासना केली होती. शिवाय सुरतेची लूट केल्यानंतर, शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला आल्याचा संदर्भही सांगितला जातो.
सप्तशृंगी देवीचा नैवेद्य पुरणपोळीच असतो. मात्र, त्याबरोबरच खुरासणीची चटणी, वरण, भात, भाजी पोळीही असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील कीर्तिध्वज फडकवतात. हा मान पूर्वपरंपरेने त्यांच्याकडे आहे. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केशरी रंगाचा असतो. हा सोहळा पंचक्रोशीत साहसाचा आणि श्रद्धेचा मानला जातो.







