पुणे : भारताने पाकिस्तानवर १९७१मध्ये मिळविलेल्या विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल काढलेल्या स्वर्णिम विजय मशालीची पुण्यात बॉम्बे सॅपर्सने रविवारी मिरवणूक काढली. या युद्धात भाग घेतलेल्यांचा सत्कारही करण्यात आला.
बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि सेंटरने छावणी परिसरात आणि आळंदी-दिघी मार्गालगत धावपटू आणि घोडेस्वारांसह दिमाखात मिरवणूक काढून विजय मशाल दिघी हिल्स येथील आपल्या दुस-या छावणीत नेली. दीघी छावणीत विजय मशालीचे स्वागत केल्यानंतर बॉम्बे सॅपर्सच्या माजी सैनिकांचा बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटरच्या कमांडंट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान, १९७१च्या युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळवलेल्या विजयाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काढलेल्या या स्वर्णिम विजय वर्ष विजय मशालीचे शनिवारी (ता. ९ ऑक्टोबर २०२१) बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटरवर भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी १९७१च्या युद्धातील माजी सैनिक, वीर नारी आणि सेवेतील अधिका-यांनी या केंद्राच्या संचलनड मैदानावर विजय मशालीचे समारंभपूर्वक स्वागत केले. भांगडा आणि झांज सादरीकरणासह औपचारिक मानवंदना दिल्यानंतर दक्षिण विभागाच्या आर्मी कमांडरांनी विजय मशालीचे स्वागत केले. बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटरने मोटरसायकलवरील कसरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. एएससी सेंटर, बंगळूर येथील टोर्नाडोज संघाने कौशल्य आणि अचूकतेचे दर्शन घडवले तसेच मलखांब, गटका आणि मार्शल आर्टसारखे पारंपरिक खेळ बॉम्बे सॅपर्सद्वारे दाखवण्यात आले. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन, एव्हीएसएम, एसएम, जीओसी-इन-सी, यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात माजी सैनिकांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव केला.







