कार्ल्याची एकवीरा आई
मुंबई आणि पुणे या दोन महानगरांच्या मधोमध आई एकवीरा देवीचं स्थान आहे. लोणावळ्याजवळील वेहरगाव-कार्ला गडावर ही आदिशक्ती वसली आहे. मनोहारी निसर्गसंपदा, कड्यांवरनं कोसळणारे जलप्रपात आणि ऐतिहासिक लेणींच्या कुशीत वसलेलं हे तीर्थक्षेत्र भक्तांना भुरळ पाडतं.
एकवीरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी
या स्तुतिगीतांतून कोळी बांधव तिची करूणा भाकतात. लोण्यावळ्यापासून १२ किलोमीटरवर हे स्थान आहे. लेणी, गड, किल्ल्यांनी नटलेल्या पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्याचं हे वैभव आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर मळवली रेल्वे स्थानकावर उतरल्यावर सहा किलोमीटरवर हे मंदिर आहे. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. सध्याच्या मंदिरात १८६६मध्ये जीर्णोद्धार झाला. परिसरात या देवीला वेहरगावची यमाई, अंबामाता किंवा परशूराम माता रेणुका अशा नावांनीही ओळखले जाते. महाराष्टातल्या विशेषत: मुंबई, ठाणे, रायगड, कोकणातील कोळी, आगरी, कायस्थ प्रभू, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजबांधवांची ही कुलस्वामिनी आहे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याचीही ही देवता असल्यानं बाळासाहेब, मॉंसाहेब दर्शनासाठी यायचे. आताही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब, आमदार, खासदारांसह एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. शिवसेनेचे तत्कालीन आमदार अनंत तरे यांनी अध्यक्ष म्हणून या तीर्थक्षेत्राचा मोठा विकास केला.
चैत्र आणि अश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह महाराष्ट्रातले लाखो भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रात रोज देवीची गाणी, भजने, आरती, पारायण, होमहवन चालते.
चैत्र महिन्यात देवीचे माहेरघर असलेल्या देवघर येथून काळबहिरी देवाची पालखी गडावर आणली जाते. हा सोहळा डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. भाविक गुलाल उधळत, देवीचा घोष करतात. तेव्हा आसमंत गुलाबी होऊन भक्तिचा मळवट गडावर रेखला जातो.







