पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत सध्या महाराजांच्या आग्रा मोहिमेच्या आठवणींचा जागर होत आहे. महाराजांच्या १७ ऑगस्ट १६६६ रोजी झालेल्या आग्राहून सुटकेच्या स्मरणार्थ आग्रा ते राजगड अशी गरूडझेप मोहीम फत्ते झाली. त्याचा समारोप रविवारी राजगडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज अॅडव्होकेट मारुती आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम झाली. मार्गावर ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास १७ ऑगस्टला सकाळी अभिषेक करण्यात आला. स्थानिक आमदार योगेंद्र उपाध्याय व इतिहास संशोधक डॉ. सुमन आनंद यांच्या हस्ते राजगडाच्या मातीचे पूजन होऊन, तेथून शिवज्योत प्रज्वलित करत गरुडझेप मोहिमेचा प्रारंभ झाला. या मोहिमेत अनेक शिवप्रेमी मावळ्यांनी सहभाग घेतला.
मोहिमेतील शिलेदार साडेतेराशे किलोमीटर पार करून राजगडावर दाखल झाले. वाटेतही शिवप्रेमींनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. या मोहिमेत सरनौबत पिलाजी गोळे यांचे चौदावे वंशज अॅड. मारुतीआबा गोळे, कान्होजी जेधे यांचे वंशज दिग्विजय जेधे, जाधव घराण्याचे वंशज गणेश जाधव व तानाजी मालुसरे यांचे वंशज महेश मालुसरे यांच्यासह ७२ मावळे सहभागी झाले. राजगडावर सर्वांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.







