नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहिली. पंतप्रधानांनी संसदेत बाबासाहेबांना पुष्पांजली वाहिली.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले; “भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी विनम्र श्रद्धांजली.”
राज्यपालांची चैत्यभूमीवर आदरांजली
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमी येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

या वेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई महापालिकेने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महत्त्वाची स्थळे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र’ आणि ‘भारतीय संविधान’ हे पुस्तक मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले.या कार्यक्रमाचे निवेदन नागसेन कांबळे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मानव कल्याण हाच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनध्यास होता. त्यासाठीच त्यांनी ज्ञानसाधना केली. समाजात समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी आपल्या विद्वत्तेचा विनियोग केला. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत दिलेले अमूल्य योगदान हे एक कारण आहे. यातून एक सशक्त असे प्रजासत्ताक राष्ट्र उभे राहू शकले. डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपण सर्व कृतज्ञ राहूया आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी कटीबद्ध होऊया. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
कोरोना प्रकोप आणि संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. गर्दी टाळावी, आरोग्य नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे. डॉ. आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.”







