नवी दिल्ली : देशात गुरुवारी दोन शाही विवाह सोहळ्यांनी सोशल मीडियावर रंगत आणली. एक राजस्थानातील माधोपुरात झाले तर, दुसरे नवी दिल्लीतल्या फार्महाउसवर. पहिले होते बॉलिवूडच्या सिलेब्रेटींचे तर, दुसरे होते राजकारणातल्या नेत्याचे.
सवाई माधोपूर : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील आलिशान हॉटेलमध्ये गुरुवारी हा शाही विवाह पार पडला. वधुवर, विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा पहिला फोटो येण्याची मोठी उत्सुकता होती. पहिल्याच छायाचित्राला १० मिनिटात लाखोंच्या लाइक्स मिळाल्या.
कतरिनाने बदामी रंगाचा घागरा तर, विकीने पंजाबी शेरवानी परिधान केली होती. विवाह सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांनी डोक्यात पंजाबी पगडी घातली होती.
या विवाहाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती.
विकी कौशल आणि कतरिना कैफचा शाही विवाह सोहळा गेल्या तीन दिवसांपासून सुरू होता. त्यात ‘संगीत’, मेंदी आणि ‘हळदी’चा कार्यक्रम झाला. बुधवारी झालेल्या ‘संगीत’ समारंभात कतरिनानं गुलाबी रंगाचा घागरा घातला होता. विकीने कतरिनाच्या घागऱ्याशी मॅच होणारी शेरवानी परिधान केली होती. कतरिनाचा घागरा फाल्गुनी आणि शेन पीकॉकनं डिझाइन केल्याची माहिती मिळाली आहे.
‘संगीत’ सेरेमनीमध्ये पंजाबी ट्रॅकवर पाहुण्यांनी ताल धरला. त्यात कतरिना आणि विकीदेखील उत्साहाने सहभागी झाले.
तेजस्वी-अलेक्सिस यांचा शाही विवाह सोहळा
लखनऊ : राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव आणि हवाई सुंदरी अॅलेक्सिस यांचा विवाह गुरुवारी झाला. ते दोघे बालमित्र असून गेल्या सहा वर्षांपासून ते परस्परांसोबत फिरत होते. एकीकडे लालूप्रसादांची नाराजी आणि दुसरीकडे करोनाचे निर्बंध अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या यादव कुटुंबीयांचा हा सोहळा निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत रंगला. बहीण मिसा भारती यांच्या फार्महाऊसवर मोजक्याच आप्तेष्टांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला.

तेजस्वीच्या लग्नाची थीम पिंक आणि ब्लू होती. फार्महाउसच्या प्रवेशद्वारावरही शुभ्र, गुलाबी फुलांची सजावट करण्यात आली होती. व्यासपीठावरही भव्य सजावट करण्यात आली होती. एकीकडे कतरीना आणि विकीच्या विवाहाच्या छायाचित्रांवर निर्बंध असताना दुसरीकडे, तेजस्वी आणि अॅलेक्सिसच्या लग्नाची छायाचित्रे मात्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. अॅलेक्सिसने लाल साडी नेसली होती तर तेजस्वी यादव यांनी सोनेरी छटा असलेली शेरवानी घातली होती.
अलेक्सिस दिल्लीच्या वसंत विहारची राहणारी आहे. ती पूर्वी हवाई सुंदरी होती. तिचे वडील चंडिगडच्या एका शाळेत प्राचार्य होते. तेजस्वीने अॅलेक्सिशी विवाह केला. पण या लग्नावर लालूप्रसाद यादव नाराज होते. अॅलेक्सिस ख्रिश्चन असल्याने लालू या लग्नावर नाराज असल्याचं सांगितलं जातं. मात्र, मुलाच्या प्रेमापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. लालू प्रसाद यादव यांनी तेजस्वी यांना आपला राजकीय वारसदार घोषित केले आहे. त्यामुळेही त्यांना मुलापुढे झुकावे लागल्याची चर्चा विवाहस्थळी होती.







