नवी दिल्ली : युवकांनाही लाजवेल अशी शरीरयष्टी असलेला ५६ वर्षीय सुपरमॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवर नवे वर्ष नव्या मार्गावर धावण्याने करणार आहेत. ते २०२१च्या अखेरीस लाठी ते सम या जैसलमेरमधील ११० किलोमीटर मार्गावर धावणार आहेत. त्यांनी याबाबतची घोषणा सोशल मीडियावर केली आहे.
रोज व्यायाम करण्यासाठी युवकांना प्रेरणा देणारा मिलिंद दरवेळी नवा विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यात मग मुंबई ते गुजरात अनवाणी प्रवास असो की, गोव्यातील किना-यावर विवस्त्र धावणे असो. चर्चेत राहण्यासाठी तो हे करतो, असा आरोप त्यांचे टीकाकार करतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत तो त्याचा इरादा बोलून दाखवतो. आता गेल्या काही वर्षांपासून पत्नी अंकिताही त्याच्याबरोबर असते.

मिलिंद वयाच्या 55 व्या वर्षीदेखील फिट आहे. काही वर्षांपूर्वी तो पुशअप्समुळे चर्चेत होता. त्याचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही त्याने शेअर केले होते. त्या व्हिडीओमध्ये त्याने पुशअप्स कसे मारायचे याचे मार्गदर्शनही केले होते. शिवाय व्हिडीओत त्याने एक मिनिटात 40 पुशअप्स मारुन दाखवले होते.







