पुणे : १८ फेब्रुवारी २०१८ – ‘माणसाला घडविण्याचे काम वाङ्मय करत असते. जीवनाचे मूल्यसंवर्धन करणे आणि बौद्धिक क्षमता वाढविण्याची भूमिका साहित्य कायमच बजावते,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांनी केले. कवी आणि पत्रकार मंगेश मधुकर कुलकर्णी यांच्या ‘सर्पीण, अजगर अन् मांत्रिक’ या कवितासंग्रहाचे आणि ई-बुकचे नुकतेच प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. पुण्यातील पत्रकार संघाच्या सभागृहात आव्हाड यांच्यासह पुणे ‘आकाशवाणी’चे उपसंचालक (वृत्त) नीतिन केळकर, ‘बुकगंगा डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. हा कवितासंग्रह ‘ऋग्वेदाज् लँग्वेज स्टुडिओ’तर्फे प्रकाशित करण्यात आला असून, ‘बुकगंगा’ने त्याचे ई-बुक प्रकाशित केले आहे.
‘तशी सर्पीण खानदानी,
त्यामुळं, अगदी डंख वगैरे नाही,
पण, उभ्या, ताठ फण्याचीच
होती भीती जगाला…
तिन्ही सांजेला तर, भीतीच
तिच्या दिसण्याची…
इथं, तिथं असण्याची…
माणूस…माणूस…सावध…
माणूस…माणूस…सावज…’
त्याचप्रमाणे
‘झेड ब्रिजवरून पाहताना,
मुठीएवढी दिसणारी मुठा
त्या दिवशी भरभरून वाहिली,
आणि काठावरच्या वस्तीच्या ‘मूळा’वर आली…
पूरस्थिती नियंत्रणाची बाराखडी;
खडकवासल्याच्या विसर्गापर्यंत थांबली.
‘मास्तर. नदीपात्रातल्या रस्त्याची वाय-झेड झालीय’
नाइट रिपोर्टरनंही आवर्जून सांगितलं…
(रिपोर्टर असंच बोलतात…)’
अशा, कवितासंग्रहातील काही कवितांच्या या वेळी झालेल्या अभिवाचनाला रसिकांनी दाद दिली.

केळकर म्हणाले, ‘ज्ञानाच्या प्रसारासाठी प्रमाणभाषा आवश्यक आहे; मात्र व्यक्त होण्यासाठी निवडण्यात येणारी भाषा ज्याची-त्याची असते. भटकंतीत आलेले अनुभव आणि भेटलेली माणसे, निसर्ग कुलकर्णी यांच्या कवितांमधून दिसून येतात.’ केळकर यांनी या प्रसंगी कवितासंग्रहातील
चिलटांनो, भाटांनो
उद्धटांनो, खटांनो…
सावध! हे साम्राज्य,
माणसांचे, गडकोटांचे आहे…
ही कविताही त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ऐकवली.
जोगळेकर यांनी ‘बुकगंगा’ करीत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देऊन साहित्यिकांनी नवतंत्रज्ञानाचा वापर करून साहित्य रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. ‘राज्याच्या कानाकोपऱ्यातील माणसे वाचनासाठी आणि नवे साहित्य वाचण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्यापर्यंत साहित्य पोहोचविण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले.
या वेळी प्रसिद्ध सूत्रसंचालिका स्नेहल दामले, पत्रकार उत्तमकुमार इंदोरे, पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन केले.
(प्रकाशनाचा सोहळा अन् त्या वेळी झालेल्या कविता अभिवाचनाच्या कार्यक्रमाची झलक सोबतच्या व्हिडिओत पाहता येईल. हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.