मुंबई : मराठी संगीत रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार, ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत (९०) यांचे शनिवारी रात्री विलेपार्ले येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी दी गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी अठरा संगीत नाटकात काम केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत, नातू अनिकेत, नातसून मोठा आप्त परिवार आहे.

रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. तेथील निसर्ग, माती आणि माणसांचे प्रतिबिंब त्यांच्या गायनात उमटलेले दिसले. त्यांनी लहानपणीपासून वडील बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. यशवंत देवांकडून त्यांनी भावगीतांचे शिक्षण घेतले.
ते अखेरपर्यंत संगीत नाटकांशी जुळले होते. ‘पूर्वेच्या देवा तुझे’, ‘ श्रीरंगा कमला कांता’ , ‘गुंतता हृदय हे’, ‘प्रथम तुज पाहता’, ‘देवा तुझा मी सोनार’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ अशी शेकडो गाणी गाऊन संगीत रंगभूमीसह लोकगीत, भावगीत, चित्रपट गीतांसाठीही आवाज दिला. एअर इंडियातील नोकरी सांभाळून त्यांनी हे सर्व केले.

गोपीनाथ सावकार, मो. ग. रांगणेकर, मास्टर दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी संगीत नाटकात काम केले. दी गोवा हिंदू असोसिएशन, गोपीनाथ सावकार कलामंदिर, मुंबई मराठी नाट्यसंघ, रंगशारदा, भरत नाट्यमंदिर, मराठी रंगभूमी, चंद्रलेखा अशा विविध नाट्यसंस्थांसोबत त्यांनी काम केले. आपल्या गुरूंबद्दल त्यांना कायम आदर होता.

संगीत मत्स्यगंधा हे त्यांचे अत्यंत गाजलेले नाटक. त्यांनी गायलेली ‘गुंतता ह्रदय हे’, ‘नको विसरू संकेत मीलनाचा’, ‘तम निराशेचा सरला’ सारखी त्यांची अनेक नाट्यपदे गाजली. ‘जन विजन झाले’, ‘अंबरातल्या निळ्या घनांची शपथ तुला आहे’, ‘श्रीरंगा कमला कांता’, ‘पूर्वेच्या देवा तुझे’, ‘देवा तुझा मी सोनार’ अशी कितीतरी गाणी आजही रसिकांच्या आठवणीत आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
‘ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांच्या निधनाने रंगभूमीवरील संगीत नाटकाच्या सुवर्णयुगाचा साक्षीदार हरपला आहे’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. संगीताचा गाढा अभ्यास केलेल्या पंडित रामदास कामत यांनी ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून संगीत रंगभूमीची अविरतपणे सेवा केली. त्यांच्या निधनाने संगीत आणि कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे’, अशा शब्दांत अजित पवार यांनी ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.







