मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि विख्यात फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याच्या निधनाने जगभरच्या त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. थायलंडमधील त्याच्या व्हिलामध्ये तो बेशुद्धावस्थेत आढळल्याचे त्याच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी रात्री जाहीर केले.त्यानंतर त्याच्या कारकिर्दीला उजाळा दिला जात आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील महान गोलंदाज शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्न त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. त्याच्या व्यवस्थापनाने एका निवेदनात याबाबतची माहिती दिली. थायलंडमधील त्याच्या व्हिलामध्ये तो मृतावस्थेत आढळला होता आणि वैद्यकीय कर्मचार्यांनी त्याला वाचविण्याचे अनेक प्रयत्न केले, असेही सूत्रांनी म्हटले आहे. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे पत्रकात म्हटले आहे.

कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून वॉर्न निवृत्त झाला. त्याची कारकिर्द त्याच्या चाहत्यांबरोबरच, जगभरातील क्रिकेटपटूंसाठी कायम स्मरणात राहील, अशीच आहे. भारतीय आणि भारताशी वॉर्नचे चांगले संबंध होते. मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकरशीही त्याची मैत्री होती.
भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सहवागसह सर्वांनी वॉर्नच्या निधनाबद्दल ट्विटद्वारे दुःख व्यक्त केलं आहे. “विश्वासच बसत नाही. महान फिरकीपटूंपैकी एक, फिरकीला कूल बनवणारा, सुपरस्टार शेन वॉर्न राहिला नाही. त्याचं कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना,” अशा शब्दांत वीरेंद्रने श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
वॉर्न यांने १९९२ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर वॉर्न यांनी त्यांच्या क्रिकेट जगतातील कारकिर्दीत १४५ कसोटी सामने खेळले असून यात ७०८ विकेट्स आणि१९४ एकदिवसीय सामन्यात २९३ विकेट्स घेतले आहेत. वॉर्न यांनी २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेतली होती. निवृत्तीनंतर ही वॉर्न यांनी आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधार होते. एवढेच नव्हे तर त्यांनी आयपीएल जेते पदाच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.
ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोन धक्के
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटविश्वाला एकाच दिवसात दोन दिग्गजांच्या मृत्यूने दोन धक्के बसले. त्यामुळे चार मार्च २०२२ हा दिवस ऑस्ट्रेलियन संघासाठी खऱ्या अर्थाने काळा दिवस ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने एकाच दिवसात आपले दोन महान दिग्गज गमावले आहेत. शुक्रवारी सकाळी माजी यष्टिरक्षक रॉडनी मार्श यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उशिरा शेन वॉर्नच्या मृत्यूच्या बातमीने ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले.







