नवी दिल्ली : देशभर ठिकठिकाणी नंदी दूध पित असल्याची चर्चा रविवारी दुपारपासूनच पसरली. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील अनेक मंदिरांत भाविकांनी दूध आणि पाणी चमच्याने नंदीला पाजण्यासाठी गर्दी केली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र, या प्रकारावर वैज्ञानिक दृष्टीकोनातून प्रकाश टाकत, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आणि विदर्भातही असे प्रकार घडले.

अकोल्यातील गुजरी बाजारातील महादेवाचा नंदी दूध पित असल्याची अफवा शनिवारी पसरली आणि नागरिकांनी गर्दी सुरू केली. सायंकाळनंतर अनेक जण हातात दूध व चमचा घेऊन नंदीस दूध पाजण्यास चढाओढ करताना दिसत होते.
राज्यात अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. औरंगाबाद, धुळे, जालना, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, वाशिमध्ये या अफवा पसरल्या. जळगाव, नाशिक जिल्ह्यातत नंदीला दूध पाजण्यासाठी नागरिकांनी मंदिराबाहेर रांगा लावल्या.
वर्धा, नगर, औरंगाबादच्या ग्रामीण भागातही अनेकांनी परिसरात असलेल्या महादेव मंदिरात दूध, पाणी पाजण्याचा प्रयोग नागरिकांनी केला.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नंदी पाणी पितो, अशा प्रकारचा चमत्कार घडत असल्याची अफवा महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडत असल्याचे सांगण्यात येत आहे व तसे व्हिडिओ प्रसारित होत आहे. खरंतर चमत्कार कधीही घडत नसतात. अशा घटनांच्या पाठीमागे विज्ञानाचे नियम, हात चलाखी, रसायनाचा वापर, सराव अशा गोष्टी असतात. म्हणून नंदी दूध पितो, ही सुद्धा अफवाच आहे. या घटनेमागील शास्त्रीय कारण म्हणजे द्रवाचा पृष्ठीय तणाव किंवा इंग्रजीत, ज्याला सरफेस टेन्शन म्हणतात तो आहे. अशा प्रकारच्या विज्ञानाच्या नियमांवर आधारित असलेली ही घटना आहे, असे अंनिसने म्हटले आहे.







