मुंबई : प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर किडनीशी संबंधित उपचार सुरू होते. ते डायलिसिसवर होते.

भारतीय सिनेमामध्ये ‘शिव-हरी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकुमार शर्मा आणि हरी प्रसाद चौरसिया या जोडीने अनेक सुपरहिट गाण्यांना संगीत दिले. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या ‘चांदनी’ चित्रपटातील ‘मेरे हाथों में नौ नौ चुडियाँ’ हे यातील सर्वात प्रसिद्ध होते.

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
पंडित शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, “पंडित शिवकुमार शर्मा जी यांच्या निधनाचा आपल्या सांस्कृतिक जगावर खोलवर परिणाम होईल. त्यांनी संतूरला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत पुढील पिढ्यांना मंत्रमुग्ध करत राहील. त्याच्याशी माझे संभाषण मला चांगले आठवते. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या संवेदना. शांती.







