वॉशिंग्टन : भारत-अमेरिका संरक्षण धोरण समूहाची वॉशिंग्टन डीसीमध्ये बैठक भारताचे संरक्षण सचिव डॉ अजय कुमार आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे अवर सचिव, डॉ. कॉलिन कॅहल यांच्या सहअध्यक्षतेखाली वॉशिंग्टन डीसीमध्ये आठ ऑक्टोबरला भारत-अमेरिका संरक्षण धोरण समूहाची (डीपीजी) बैठक झाली. द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या सर्व बाबींचा सर्वसमावेशक आढावा त्यात घेण्यात आला. संरक्षण धोरण समूह ही भारत आणि अमेरिकेच्या संरक्षण विभागांतील सर्वोच्च अधिकारीस्तरीय यंत्रणा आहे.
भारत-अमेरिका प्रमुख संरक्षण भागीदारी, लष्कर ते लष्कर संबंध वाढवणे, मूलभूत संरक्षण करारांची अंमलबजावणी, संरक्षण सराव, तंत्रज्ञान सहकार्य आणि संरक्षण व्यापार करण्याबाबतच्या प्रगतीचा आढावा, या बैठकीत घेण्यात आला. दोन्ही बाजूंनी प्रादेशिक सुरक्षा दृष्टीकोन आणि सहकार्य सामायिक करण्यात आले आणि भारत पॅसिफिक प्रदेशात सामायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने एकत्र काम करण्याचे मान्य करण्यात आले.
विविध द्विपक्षीय संरक्षण उपक्रम आणि यंत्रणांनी केलेल्या प्रगतीची माहिती सह-अध्यक्षांना देण्यात आली. संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार उपक्रमाअंतर्गत हवाई- प्रक्षेपण मानवरहित हवाई प्रक्षेपक (यूएव्ही) सह-विकसित करण्यासाठी त्यांनी संयुक्त प्रकल्पाचा आढावा घेतला. उच्चस्तरीय संरक्षण औद्योगिक सहकार्य सुलभ करण्यासाठी भारतात आयोजित पहिल्या औद्योगिक सुरक्षा करार बैठकीचे उभय देशांनी स्वागत केले. संरक्षण उद्योगांमध्ये सह-विकास आणि सह-उत्पादनासाठी, विद्यमान नवोन्मेषी कार्यक्षेत्राचा वापर करण्याच्या दृष्टीने, खाजगी आणि सरकारी दोन्ही भागधारकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सहमती दर्शवली. अंतराळ, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर आणि मानवरहित हवाई प्रक्षेपक तंत्रज्ञानासारख्या नवीन क्षेत्रातील सहकार्याचे दोन्ही देशांनी स्वागत केले.
आगामी २+२ मंत्रीस्तरीय चर्चेच्या तयारीचा दोन्ही बाजूंनी आढावा घेण्यात आला. संरक्षण धोरण समूहाची पुढील बैठक परस्पर सोयीच्या तारखांना भारतात घेण्याबाबत या प्रसंगी सहमती झाली.







