जय भवानी, जय शिवाजी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखिल देशवासीयांचं दैवत. अस्मानी अन् सुलतानी संकटात पिचलेल्या उभ्या महाराष्ट्राला महाराजांनी परमवैभव दिलं. शक्ती, भक्ती अन् युक्तीनं छत्रपतींनी हरेक संकटावर मात केली. छातीचा कोट केला मातीचं ऋण फेडलं आणि बलाढ्य छातीतल्या काळजात माणसांसाठी प्रीती ठेवली. तुळजापूरची आई भवानी म्हणजे भोसले घराण्याचं कुलदैवत. महाराज स्वतःला देवीचा भोपी समजायचे. कोणत्याही मोहिमेवर जाण्यापूर्वी ते मॉंसाहेब आई जिजाऊ आणि आई भवानीचा आशीर्वाद घ्यायचे. तिच्या नावानं कुंकवाचा टिळा भाळी मिरवायचे आणि फत्ते होऊनच यायचे.
महाराजाचा जन्म झाला पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरी किल्ल्यावर. तिथल्या शिवाई देवीवरूनच महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलंय. म्हणजे आदिमाया, आदिशक्तीनं महाराजांवर बालपणापासूनच कृपेचं छत्र धरलं होतं. राजमाता जिजाऊंनी या देवीला नवस केला होता. त्यांनी देवीची मनापासून केलेली प्रार्थना फलदायी ठरली. त्यांनी मागितलेलं दान सा-या महाराष्ट्रासाठी होतं… इथल्या मातीसाठी होतं… इथल्या माणसांसाठी होतं. पारतंत्र्यांच्या बेड्या तोडण्यासाठी त्यांनी, महापराक्रमी पुत्रासाठी, शिवाई देवीला जणू साकडं घातलं होतं. देवीनं मागणं मान्य केलं. आणि सह्याद्रीला परम पराक्रमी, तेजस्वी, ओजस्वी, महाधुंरधर नेता मिळाला, लाडका राजा मिळाला.
शिवाई देवी ही स्वयंभू आहे. इथल्या कातळ शिल्पांत हेही ठाणं होतं. कुसूरच्या ग्रामस्थांनी १९४७मध्ये देवीची मूर्ती स्थापन केली. ती चतुर्भूज असून प्रत्येक हातांत शस्त्र आहे. गदा, तलवार अशी आयुधं घेतलेल्या मूर्तीच्या बाजूस महिषासुराची प्रतिमाही आहे. तिचे वाहन सिंह असून मूर्तीची उंची तीन फुटांपेक्षा अधिक आहे. शिवाई मंदिराला सभामंडप आणि गाभाराही आहे. पाच लाकडी खांबांच्या दोन रांगांनी मंदिर तोलून धरलं आहे. अलीकडच्या काळात अभ्यासकांना शिवाई देवीची काही जुनी छायाचित्रं आणि संदर्भही सापडले आहेत. शिवाई देवीच्या निगराणीतच छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं. युद्धनीतीचे, संघटनाचे पहिले धडे त्यांनी तिच्या देखतच गिरवले.
..
तुळजापूरची तुळजाभवानी महाराजांच्या भोसले कुटुंबांचं कुलदैवत. त्यामुळं महाराजांची तिच्यावरही मोठी श्रद्धा होती. मातेनंच महाराजांना भवानी तलवार दिल्याची श्रद्धा आहे. आजही त्याची आठवण म्हणून तुळजापूरच्या नवरात्रोत्सवात एक दिवस देवीची भवानी तलवार रूपात अलंकार पूजा मांडली जाते. या भवानी तलवारीनं पुढं स्वराज्यांची पताका सहयाद्रीच्या अंगणातनं उभ्या देशाच्या गगनात डौलानं फडकावली हा जिवंत इतिहास आहे.
महाराज कुठेही असले तरी, आई भवानीपुढं नतमस्तक झाल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नसे. विजापूरचा सरदार अफजलखानानं तुळजापूरसह अन्य मंदिरं लुटल्याचं कळताच छत्रपती शिवाजी महाराजांची तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचली होती. खानाचा कायमचा बंदोबस्त करायचा निर्धार त्यांनी जणू तेव्हाच केला होता. त्यासाठी ते फक्त वाट पाहात होते काळ आणि वेळेची. तो मुहूर्त आला १० नोव्हेंबर १६५९ रोजी. महाराजांनी प्रतापगडाखालीच खानाशी दोन हात केले आणि त्याला लोळवलं. महाराष्ट्राच्या आई भवानीचं ठाणं त्यांनी मग प्रतापगडावर स्थापन केलं. हे तुळजाभवानीचं मंदिर आजही मोठ्या दिमाखात उभं असून नव्या पिढीला प्रेरणा देत आहे. हे मंदिर खासगी असून आजही छत्रपतींचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातर्फे तिथं व्यवस्था ठेवली जाते. शिवाजी महाराजांनीच त्यांच्या काळात देवीची पूजा, वार्षिक विधी, पुजारी यांसाठी आर्थिक तरतूद करून ठेवली होती. संभाजी महाराज, राजाराम महाराजांनी त्यात आणखी भर घातली. पेशवाईतही सरखेल कान्होजी आंग्रे यांनी या संस्थानला देणग्या दिल्या. महाराजांनी हिमालयातून शिला आणवून तुळजापूरच्या मूर्तीसारखीच ही मूर्ती बनवून घेतली. ही दोन फुट उंचीची असून मुकुटावर शिवलिंग आहे. देवी अष्टभूजा असून आठही हातात शस्त्रे आहेत. दोन्ही चंद्र-सूर्यही झळकत असून प्रसन्नवदनी ही मूर्ती भक्तांना आश्वस्त करणारी आहे. महाराजांच्या आज्ञेनुसार अमात्य मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. महाराजांच्या काळात नवरात्रोत्सवात मोठा उत्सव होई. देवीची पालखी अफजलखानाच्या कबरीपर्यंत नेली जात असे. प्रत्येक पौर्णिमेला देवीची पालखी निघे. त्रिपुरारी पौर्णिमेस रात्री देवळासमोरील दीपमाळा प्रज्वलित केल्या जात. गड उजळून निघे. महाराज सहा जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर सिंहासनाधीश्वर झाले. छत्रपती होण्यापूर्वी त्यांनी १९ मे १६७४ रोजी प्रतापगडावर येऊन भवानी मातेला सोन्याचे छत्र अर्पण केलं. कुलस्वामिनीला स्वराज्याच्या राज्याभिषेकाचं निमंत्रण देऊन मग त्यांनी पुढचा सोहळा केला. महाराजांनी सुरू केलेले अनेक उपक्रम सुरू आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रतापगड नवरात्रात जागवण्याची प्रथा सुरू ठेवली. देवीच्या देवळाभोवती पेटत्या मशाली घेऊन, देवीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर ते करतात. तटबंदी, दीपमाळा पुन्हा प्रज्वलित होतात, आई भवानीच्या दरबारात, -आई राजा उदो उदो-चा गजर होतो. पालखी निघते. नवी पिढी ही पालखी खांद्यावर घेते आणि पुन्हा आईला साकडं घालते.
तिकडं तुळजापुरात आजही पहिली पूजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं होतं. त्यासाठीची तरतूद महाराजांनीच करून दिली आहे. पहिल्या अभिषेकापासून दोन वेळचा नैवेद्य आणि रात्रीची प्रक्षाळ पूजा महाराजांतर्फे होते. इतकंच नव्हे तर संबळ, सनई-चौघड्यासाठीचं मानधन आजही त्याच पद्धतीनं दिलं जातं. देवीच्या अलंकारातही महाराजांनी दिलेले अनेक दागिने भवानी मातेला शोभून दिसतात.
छत्रपती शिवाजी महाराजांवर जन्मापासून देवीनं कृपा केली. महाराजांनीही देवीला समष्टीसाठी कायम साकडं घातलं. जन्मस्थळ असलेली शिवनेरीवरली शिवाई असो की, प्रतापगडावरली तुळजाभवानी, तुळजापूरच्या आई भवानी असो की, महाराष्ट्रातलं आदिशक्ती, आदिमायेचं कोणतही तीर्थक्षेत्र असो. लढायांच्या, फंद-फितुरीच्या धावपळीतही देवीच्या गाभा-यात दिवा कायम प्रज्वलित ठेवण्याकडं त्यांचं लक्ष असे. आदिशक्तीच्या मंदिरात लक्ष दिवे उजळावेत यासाठी महाराजांनी इनाम दिले. कायमची तजवीज केली. देवीनंही छत्रपती शिवाजी महाराजांवर कायम कृपेची पाखर केली आणि त्यांनी घातलेलं स्वराज्याचं, आई भवानीचा मुक्तपणे जागर करण्याचं स्वातंत्र्यही दिलं.
तेव्हा नवरात्रीच्या आणि त्यातही खंडेनवमीच्या दिवशी, जेव्हा शस्त्रांची पूजा केली जाते तेव्हा शस्त्र आणि शास्त्र, शक्ती आणि भक्ती असा संगम असलेल्या आई तुळजा भवानी आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपण गजर करू या.
जय भवानी, जय शिवाजी
जय भवान, जय शिवाजी
https://youtu.be/7HS8oKvt4Es







