अंबाजोगाई (जि. बीड) येथील योगेश्वरी देवी कुमारिका म्हणून ओळखली जाते. मराठवाड्यातील हे तीर्थक्षेत्र कोकणातील चित्पावनांची कुलदेवता आहे. मंदिर यादवकालीन असून मराठीचे आद्यकवी मुकुंदराज आणि ‘पासोडी’कार दासोपंतांचा अधिवास या क्षेत्राला लाभला आहे.
योगेश्वरी नाम त्रिभुवन विख्याते
निळकंठ ओवाळू कैवल्य माते
जय देवी जय देवी जय योगेश्वरी
या तिच्या आरतीमध्ये तिची स्तुती केली आहे. कोकणस्थांची ती कुलदेवता असल्यानं मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोव्यातून भाविक सहकुटुंब, सहपरिवार दर्शनासाठी येतात. जोगाइ मंदिर, हत्तीखाना लेणी, पासोडीवर लेखन करणारे संत दासोपंत, मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांची समाधी, हेमाडपंती बांधकाम असलेले खोलेश्वर मंदिर अशी अनेक ठिकाणे शहरात आहेत. तांदळा स्वरूपातली ही देवी अंबाजोगाईत कशी आली, असा प्रश्न अनेकांना पडतो. परळीच्या वैद्यनाथ अर्थात वैजनाथांशी योगेश्वरीचा विवाह ठरला. कोकणातनं व-हाडी परळीस आले. मात्र, मुहूर्त टळला. विवाह झाला नाही. देवी मग, कोकणात न जाता इथंच विसावली, अशी कथा सांगितली जाते.
अंबाजोगाईतल्या जयंती नदीकाठी पश्चिम तटी हे मंदिर आहे. तटबंदी, उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना दरवाजे, प्रांगणात दोन दीपमाळा अशी त्याची भव्यता आहे. शिखरावर पाच मजली कळस आहे. कळसावरही देवीदेवतांच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिर दगडी असून गाभाऱ्यात चबुतऱ्यावर देवीचा मुखवटा आहे. मंदिराच्या प्रांगणात गणपती, देवीची उत्सवमूर्ती असून होमकुंडही. देवीनं दांतसुराचा वध केल्याची श्रद्धा आहे.
देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तांबुलाचा प्रसादही असतो. नवरात्रोत्सवात मंदिराला रोषणाई केली जाते. योगविद्येमध्ये देवी पारंगत असल्याची श्रद्धा आहे. तिचे नावही त्यावरून पडले असावे, असे जाणकारांचे मत आहे.







