जालना : बुलडाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या शहागड (ता. अंबड, जि. जालना) शाखेवर पडलेल्या सशस्त्र दरोडा प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. या शाखेवर गुरुवारी सायंकाळी तीन सशस्त्र दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकाने २५ लाख रुपये रोख आणि सुमारे एक कोटी रूपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.
औरंगाबाद विभागाचे पोलिस महासंचालक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी शहागड येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आदींनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली.
असा घडला होता थरार…
धुळे-औरंगाबाद सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या शाखेत सायंकाळी तीन सशस्त्र दरोडेखोर आले. त्यांच्या तोंडावर रुमाल व हातात पिस्तूल होते. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखून धमकी दिली. एकेकाला बाजूला केले आणि दरवाजा बंद केला. हा दरोडा सिनेस्टाइल घडला. एकूण थरार सात मिनिटे चालला.
लेखापाल प्रमोद पुंडे यांच्या डोक्याला एकाने पिस्तूल लावून त्यांना स्ट्राँगरूममध्ये नेण्यात आले. तिजोरीच्या किल्ल्या ताब्यात घेऊन लॉकरमधील ग्राहकांनी सोने तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची पाकिटे व तिजोरीतील रोख रक्कम अंदाजे २५ लाख रुपये असा ऐवज त्यांनी बॅगेत भरला. कर्मचाऱ्यांना लॉकररूम मध्ये बंद केले आणि दरोडेखो मोटरसायकलवरून फरार झाले.
दरोडेखोर ३० ते ३२ या वयोगटातील होते, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये दोन सडपातळ एक जाडजुड होता एकाने काळाशर्ट,एक पांढऱ्या रंगाचा शर्ट व तिसरा चौकटी रंगाचा शर्ट घातलेला होता. तिघांच्या तोंडाला बांधलेला रुमाल व हातात पिस्तूल होते. पतसंस्थेसमोरच्या झाडाजवळ लावलेल्या मोटरसायकलवरून ते गोदावरी नदीवरील पुलावरून पुढे पैठण फाट्याच्या दिशेने ते वेगात गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी लॉकर रूम मध्ये बंद असलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका केली. चकलांबा, उमापूर, पैठण, अंबड व पाचोड पोलिसांशी संपर्क साधून नाका-बंदी करून दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली. पोलिसांच्या श्वानाने मागोवा दाखवला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील तपास निश्चित केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दिली.
पतसंस्थेवर दरोडा पडल्याचे समजताच सोनेतारण ठेवलेल्या कर्जदार खातेदारांनी मोठी गर्दी केली.







