नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून भारताची 75 प्रगतीशील वर्षे आणि भारतीय लोक, त्यांची संस्कृती आणि त्यांनी मिळवलेल्या यशांचा वैभवसंपन्न इतिहास साजरा करण्यासाठी आज 26 नोव्हेंबर रोजी होणारा संविधान दिन अधिक जोश, उत्साह आणि आनंदाने साजरा होणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांच्या नेतृत्वाखाली हा संविधान दिनाचा कार्यक्रम, संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सकाळी 11 वाजतापासून सुरू होणार आहे.

यावेळी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती, केंद्रीय मंत्री, खासदार आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम संसद टीव्ही/डीडी आणि इतर टीव्ही वाहिन्यांवरुन तसेच ऑनलाईन पोर्टलवरुनही थेट दाखवला जाणार आहे.
राष्ट्रपतींच्या भाषणानंतर संपूर्ण देशाला राष्ट्रपतींच्या समवेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियम लागू असल्याने, सर्व संस्थांमधील लोकांसह, नागरिकांनी 26 नोव्हेंबर 2021 रोजी, आपापल्या जागी राहून माननीय राष्ट्रपतींसमवेत या उद्देशिकेचे वाचन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. या भाषणानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते, “घटनात्मक लोकशाहीवर ऑनलाईन प्रश्नमंजूषा ” ( mpa.nic.in/constitution-day) चे उद्घाटन होणार आहे. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे वचन करण्याविषयीचे एक पोर्टल तयार करण्यात आले असून ते 23 भाषांमध्ये (22 अधिकृत भाषा आणि इंग्रजी) उपलब्ध आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपासून लाईव्ह असणार आहे. त्यावर उद्देशिकेचे वाचन करत, mpa.gov.in/constitution-day. या लिंकवरुन सर्व नागरिक आपापले प्रमाणपत्र डाउनलोड करु शकतील.







