नवी दिल्ली : होयसळ राजवंशातील राजांनी दक्षिण भारतात बांधलेल्या अतिभव्य, अतिसुंदर मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेशासाठी केंद्र सरकारने प्रस्ताव पाठविला आहे. दक्षिण भारतातील बेलूर, हळेबीड, सोमनाथपूर येथील ही तीन मंदिरे वास्तुशिल्पशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. या मंदिरांच्या वास्तुशिल्पशैलीत चालुक्यशैलीच्या वास्तुगुणविशेषांचे मिश्रण आढळते. ही शैली चालुक्य-होयसळ अशा संयुक्त नावांनी ओळखली जाते. हसन जिल्ह्यातील बेलूर, हळेबीड आणि म्हैसूर जिल्ह्यातील सोमनाथपूर या ठिकाणी ही नेत्रदीपक कलाविष्कार असलेली मंदिरे आहेत.

बेलूर, हळेबीड व सोमनाथपूर येथील मंदिरे या सर्वांत लक्षणीय आहे. हे मंदिर कलात्मक, अलंकृत, वैविध्यपूर्ण शिल्पांनी नटलेली आहेत. ही प्रातिनिधिक मंदिरे असून होयसळ राजांनी एकूण ८० मंदिरे बांधल्याचा उल्लेख आहे. होत. त्यांपैकी लक्ष्मीदेवी हे सर्वांत प्राचीन (१११३) समजले जाते. ते कुल्लहान राऊत नावाच्या व्यापारी पतीपत्नीनी बांधले. हरिहर हेही (दोड्डगड्डहळ्ळी) सुरुवातीचे एक मंदिर आहे. हर्जहळ्ळी येथील सोमेश्वर व नुग्गीहळ्ळी येथील लक्ष्मीनरसिंह ही मंदिरे होयसळांच्या अखेरच्या काळातील होत. चेन्नकेशव (बेलूर) हे अत्यंत अलंकृत मंदिर असून होयसळ वास्तुशिल्प-शैलीचा परिपक्व आविष्कार येथे दृग्गोचर होतो. हळेबीड येथे होयसळेश्वर व केदारेश्वर ही दोन उल्लेखनीय मंदिरे असून होयसळेश्वर हे चालुक्य-होयसळ शैलीतील सर्वांगीण आविष्कार दर्शविणारे, सर्वांगांनी अलंकृत असलेले या शैलीतील आकाराने सर्वांत मोठे मंदिर होय. ते बिट्टिदेव ऊर्फ विष्णुवर्धन याने बांधले असून सुरुवातीस होयसळेश्वर व त्याच्या शेजारी शांतलेश्वर अशी दोन स्वतंत्र मंदिरे होती. नंतर ती जोडून एक केली गेली.

होयसळ शैलीतील तिसरे प्रसिद्ध मंदिर सोमनाथपूर येथे असून ते सोमनाथनामक सेनापतीने १२६८ मध्ये बांधले. हे मंदिर उत्तर होयसळ स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. ते होयसळेश्वर व चेन्नकेशव मंदिरांपेक्षा आकाराने लहान आहे. होयसळ मंदिरांच्या भिंतींवर, स्तंभांवर, पीठावर विपुल शिल्पांकन आहे. चौथऱ्याचे अनेक विभाग करून त्यांत निरनिराळ्या प्रकारच्या आकृत्या, पशु-पक्षी, पाने, फुले, शरभ, हत्ती वगैरे कोरलेले आहेत. विमानाच्या खालील भागात असंख्य महिरपी कोनाडे असून त्यांत देवदेवता, मदनिका, सुरसुंदरींच्या अत्यंत रेखीव मूर्ती आहेत.







