नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये कुसुमाग्रज यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी केली जाते. याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी सोमवारी महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना भेटून केली.

मराठी भाषा ही अभिजात आहे याविषयीची सविस्तर माहिती मंत्री देसाई यांनी दिलीच, यासोबतच मराठी भाषेबद्दल सुलभ संदर्भ म्हणून आतापर्यंत झालेल्या वाटचालीची पुस्तिका, आणि निवेदन केंद्रीय मंत्री श्री रेड्डी यांना दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याबाबतचे सर्वच निकष, अटींचे पालन केले असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. रेड्डी यांनी सांगितले. यासोबत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही याबाबत सकारात्मक दृष्टीकोन असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्र सरकार यावर शक्य तितक्या लवकर निर्णय घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
श्री. देसाई यांनी श्री. रेड्डी यांना कुसुमाग्रज जयंतीनिमित्त साज-या केल्या जाणा-या ‘मराठी भाषा गौरव दिना’ला मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले. याच दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबतची घोषणाही करण्याची मागणी केली.
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी जनअभियानाचे रूप आले आहे, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे.
यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हजारो पोस्ट कार्डसच्या माध्यमातूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, अशी मागणी करणारी पत्रे महाराष्ट्राच्या कान्याकोप-यातून पाठविली आहेत, असेही या प्रसंगी केंद्रीय मंत्र्यांना सांगण्यात आले.
यावेळी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
..
राष्ट्रपतींना पत्रे रवाना
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा मागणीची ४००० पोस्टकार्डस मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे रवाना करण्यात आली. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनअभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महामहीम राष्ट्रपती यांना लिहिलेली सुमारे सहा हजार पत्रे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ती दिल्लीकडे रवाना करण्यात आली. याआधी सुमारे एक लाख २० हजार पोस्ट कार्ड्स पाठविण्यात आली आहेत. खासदार अरविंद सावंत या प्रसंगी उपस्थित होते.








